तियानजिन येथे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची 10 मिनिटं वाट पाहिली. दोन्ही नेते एकाच गाडीत तब्बल 45 मिनिटं चर्चा करत होते, जे जागतिक कूटनीतीत फारच दुर्मिळ मानले जाते. त्यानंतर दोघांमध्ये आणखी 45 मिनिटांची द्विपक्षीय बैठक झाली. हे मोदी-पुतिन यांच्यातील घट्ट समझदारी आणि भारत-रशियाच्या विश्वासाचे प्रतीक मानले जात आहे.
पुतिनकडून मोदींसाठी 10 मिनिटांची प्रतीक्षा
पुतिन यांच्याबद्दल प्रसिद्ध आहे की, जे जागतिक नेते त्यांना नकोसे वाटतात त्यांना ते मुद्दाम थांबवतात. पण तियानजिनमध्ये उलट चित्र दिसले. पुतिन स्वतः मोदींची 10 मिनिटं वाट पाहत होते, जेणेकरून ते एकत्रित हॉटेलकडे जाऊन बैठक घेऊ शकतील. त्याच गाडीतून जाण्याचा प्रस्तावही पुतिन यांनीच दिला.
कारमध्ये 45 मिनिटांची चर्चा
विशेष म्हणजे, दोघेही नेते जेव्हा परिषद स्थळावरून एका गाडीतून हॉटेलकडे गेले, तेव्हा गाडीच्या आतच तब्बल 45 मिनिटं गंभीर चर्चा सुरू होती. जागतिक कूटनीतीत अशा प्रकारे दोन मोठ्या देशांचे नेते गाडीत इतका वेळ संवाद साधत असल्याचा हा पहिलाच प्रसंग मानला जातो. त्यानंतर औपचारिक द्विपक्षीय बैठक 45 मिनिटं चालली.
भारत-रशिया संबंधांतील विश्वास
हा प्रसंग केवळ मोदी-पुतिन यांच्यातील समझदारी दाखवणारा नाही, तर भारत-रशियातील विश्वासाचेही प्रतीक आहे. गेल्या वर्षी मोदी जेव्हा रशियात गेले होते, तेव्हा ते पुतिन यांच्या खासगी निवासस्थानी साडेपाच तास थांबले होते. त्यावेळी पाश्चात्य देशांच्या भुवया उंचावल्या होत्या.
भारत-रशिया-चीनकडे जगाचे लक्ष
ट्रम्प पुन्हा सत्तेत आल्यानंतर त्यांनी ज्या प्रकारे चीन-रशियाबरोबर भारतालाही लक्ष्य केले आहे, त्यानंतर तियानजिनमधील या तिन्ही नेत्यांच्या प्रत्येक हालचालीकडे जगभराचे लक्ष लागले होते.
तिघांमधील मैत्रीपूर्ण वातावरण
तियानजिनमध्ये मोदी, पुतिन आणि शी जिनपिंग यांच्यात जबरदस्त केमिस्ट्री दिसली. चीनने मोदींसाठी होंगशी एल-5 लिमोझिन उपलब्ध करून दिली, जी सहसा शी जिनपिंग किंवा अतिशय खास परदेशी पाहुण्यांसाठीच वापरली जाते. परिषद सुरू होण्यापूर्वी तिघेही एकत्र हसतखेळत गप्पा मारताना दिसले. पुतिन आणि शी जिनपिंगसोबत सर्वाधिक द्विपक्षीय बैठक मोदींनीच घेतल्या असून त्यांच्या संबंधांमध्ये औपचारिक कूटनीतीपलीकडे एक वेगळीच जुळवाजुळव
स्पष्टपणे जाणवत होती.
