Home » प्रिती झिंटाची वीर नारिंना सलामी; ऑपरेशन सिंदूरनंतर आर्मी वाइव्स वेल्फेअर असोसिएशनला 1 कोटींचे योगदान

प्रिती झिंटाची वीर नारिंना सलामी; ऑपरेशन सिंदूरनंतर आर्मी वाइव्स वेल्फेअर असोसिएशनला 1 कोटींचे योगदान

बॉलीवूड अभिनेत्री व पंजाब किंग्ज (IPL) संघाची सहमालक प्रिती झिंटा यांनी भारतीय लष्कराच्या साउथ वेस्टर्न कमांड अंतर्गत आर्मी वाइव्स वेल्फेअर असोसिएशन (AWWA) ला 1 कोटी रुपये मदत दिली आहे. ही मदत त्यांनी 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर केली आहे. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा बळी गेला होता.

प्रिती झिंटाने रविवारी आपल्या इन्स्टाग्रामवरून एक भावनिक व्हिडीओ आणि पोस्ट शेअर केली. ती लष्कराच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी कार्यक्रमात सहभागी झाली होती. पारंपरिक पोशाखात झळकलेली प्रिती झिंटा ‘वीर नारिं’च्या सोबत उभी राहून त्यांना मानाचा मुजरा करताना दिसली.

तिने आपल्या भाषणात म्हटले, “आपली भारतीय सेना फक्त पराक्रमीच नाही, तर अत्यंत शूर आहे. पण त्याहूनही अधिक धैर्यवान त्यांच्या कुटुंबातील सदस्य आहेत. ही मदत आमच्या कडून एक लहानशी भेट आहे.”

झिंटाने आपल्या पोस्टमध्ये कार्यक्रमातील अनुभव वर्णन करत लिहिले:

“साउथ वेस्टर्न कमांडच्या सभागृहाकडे जाताना मी अनेक ठिकाणी शौर्य पुरस्कार मिळवलेल्या जवानांचे फलक पाहिले. काहींनी देशासाठी प्राण अर्पण केले, काही जखमांसह परतले. हे सर्व कोणाचे तरी पती, मुलगे, भाऊ आणि वडील होते. आपण त्यांना कधीच ओळखणार नाही, त्यांची कहाणी ऐकणार नाही किंवा त्यांच्यासाठी व्याकुळ होणार नाही. आपण त्यांच्या शौर्याचा क्षणभर गौरव करतो आणि लगेच आपले जीवन सुरू ठेवतो – हीच खरी आणि कटू वस्तुस्थिती आहे.”

“कार्यक्रमात मी अशा महिलांना भेटले जे आपले पती, वडील, भावंडं हरवूनही खंबीर आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर अश्रू नव्हते, तक्रारी नव्हत्या – फक्त अभिमान होता, धैर्य होतं आणि त्यागाची भावना होती. तिथे उपस्थित वीर नारिंचा साक्षात्कार माझ्यासाठी अत्यंत नम्र करणारा अनुभव होता.”

“मी लष्कराच्या या परिवारांसाठी एक लहानशी मदत घेऊन गेले होते, त्यांच्या सेवेबद्दल आणि त्यागाबद्दल आभार मानण्यासाठी. कार्यक्रम संपताना माझ्या चेहऱ्यावर हसू होतं आणि मनात कृतज्ञतेची भावना होती. देशाच्या सीमांचं रक्षण करत असलेल्या या वीरांच्या उपस्थितीत मला खात्री वाटते – आपला देश सुरक्षित हातांमध्ये आहे.”

“मी माझं कर्तव्य पार पाडलं, आता माझी मनापासून इच्छा आहे की तुम्हीही काही ना काही करून या कुटुंबियांना धन्यवाद द्याल. जय हिंद!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *