नांदेड : जिल्ह्यातील निबंधन कार्यालयांमध्ये खरेदी-विक्री व्यवहारासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. अशा व्यवहारांमध्ये पारदर्शकता राखणं अपेक्षित असतानाही अनेक गैरव्यवहार घडत असल्याचं वारंवार समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर हदगाव निबंधक कार्यालयात 190 पेक्षा अधिक नोंदणी दस्तऐवजांमध्ये अनियमितता आढळून आली आहे.
या गंभीर प्रकाराची दखल घेत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी तत्काळ कारवाई करत दुय्यम निबंधक सेवलीकर यांना निलंबित केले. त्यांच्या कामातील शिस्त आणि तत्परतेमुळे कर्डिले यांना प्रशासनात ठाम स्थान मिळाले आहे.
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तालुक्यांच्या मर्यादा शिथिल करत कुठल्याही तालुक्यात कुठल्याही भागाची नोंदणी करता येईल असा आदेश दिला होता. मात्र, याच सूटचा गैरवापर करत हदगाव कार्यालयात गेल्या महिन्यात तब्बल १२०० रजिस्ट्री करण्यात आल्या. त्यापैकी ९०% नोंदण्या इतर तालुक्यांमधील असल्याचं निष्पन्न झालं.
तक्रारीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तपासात उघडकीस आलं की कोणतेही नियमानुसार दस्तऐवजांची नोंदणी करण्यात आलेली नव्हती. सहनिबंधकांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या तपासात सुमारे ४०० कागदपत्रं तपासली गेली, त्यापैकी १९० रजिस्ट्री प्रक्रिया नियमबाह्य असल्याचं स्पष्ट झालं. यामुळेच सेवलीकर यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आली.
राहुल कर्डिले कोण आहेत?
कठोर शिस्तीचे, प्रामाणिक व लोकहितासाठी झटणारे अधिकारी म्हणून कर्डिले यांची ओळख आहे. एका महिन्यात त्यांची तीन वेळा बदली होऊनही ते कार्यरत राहिले. मूळचे अहिल्यानगर जिल्ह्यातील ठाणगाव येथील रहिवासी असलेल्या कर्डिले यांचे शिक्षण पार्थडीजवळील करंजी गावात झाले. विखे महाविद्यालयातून त्यांनी अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केलं आणि नंतर स्पर्धा परीक्षेचा मार्ग पत्करला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत उपनिबंधक पदावर निवड झाल्यानंतर त्यांनी UPSC मध्ये तीन वेळा अपयश पत्करलं, पण चौथ्या प्रयत्नात देशात ४२२ वा क्रमांक मिळवत यश मिळवलं.
त्यांची पत्नी प्रियंका कर्डिले देखील प्रशासन सेवेत कार्यरत असून सध्या उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत आहेत.
