मुंबईत अपात्कालीन लँडिंग:
दिल्लीहून गोव्याकडे जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाइट 6E 6271 मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विमानाची मुंबईत आपत्कालीन लँडिंग करण्यात आली. या विमानात एकूण 191 प्रवासी होते. पायलटने इंजिनमध्ये बिघाड असल्याची सूचना देताना ‘PAN PAN PAN’ असा संदेश दिला, जो संभाव्य धोका दर्शवणारा आपत्कालीन संकेत मानला जातो.
इंजिन बिघाडामुळे लँडिंग:
इंडिगोची फ्लाइट दिल्लीहून गोव्यासाठी रवाना झाली होती. मात्र उड्डाणानंतर काही वेळातच पायलटने तांत्रिक अडचणीची माहिती दिली आणि अंदाजे रात्री 9.52 वाजता विमानाचे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षित लँडिंग करण्यात आले.
‘PAN PAN PAN’ म्हणजे काय?
हा संकेत पायलटकडून दिला गेला तेव्हा विमानाच्या इंजिनमध्ये तांत्रिक त्रुटी आढळली होती. ‘PAN PAN PAN’ हा एक आंतरराष्ट्रीय सिग्नल आहे, जो जीवाला धोका नसलेल्या पण गंभीर अडचणीच्या प्रसंगी वापरला जातो.
हा संदेश फ्रेंच शब्द ‘panne’ वरून घेतला आहे, ज्याचा अर्थ “तांत्रिक बिघाड” असा होतो.
MAYDAY आणि PAN PAN PAN यातील फरक:
PAN PAN PAN मध्यम स्तराच्या आपत्कालीन परिस्थितीसाठी वापरला जातो. यात तात्काळ धोका नसतो, पण तातडीची मदत आवश्यक असते.
MAYDAY हे अत्यंत गंभीर प्रसंगांसाठी वापरले जाते, जिथे तात्काळ जीवाला धोका संभवतो.
म्हणजेच PAN PAN PAN हे MAYDAY पेक्षा कमी गंभीर स्थिती दर्शवते.
विमानात किती प्रवासी होते?
इंडिगोच्या या फ्लाइटमध्ये एकूण 191 प्रवासी होते. विमानाने दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केलं होतं आणि गोव्याच्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचायचं होतं. मात्र, इंजिन बिघाडामुळे मध्येच मुंबईत लँडिंग करण्यात आलं.
इंडिगो कंपनीचा खुलासा:
इंडिगोने इंजिन फेल झाल्याचं अधिकृतपणे जाहीर केलं नाही. त्यांच्या निवेदनात सांगण्यात आलं की, “16 जुलै रोजी दिल्लीहून गोव्याकडे जाणाऱ्या फ्लाइटमध्ये उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाड दिसून आला. नियमांप्रमाणे विमान मुंबईत वळवण्यात आलं. विमान पुन्हा सेवा देण्यापूर्वी सर्व तपासण्या केल्या जातील.”
