भारतीय लष्करासाठी अत्याधुनिक ‘क्लाश्निकोव एके-203’ रायफल आता पूर्णपणे भारतात तयार होणार असून, तिला ‘शेर’ हे स्वदेशी नाव देण्यात येणार आहे. अमेठी येथील कारखान्यात तयार होणाऱ्या या रायफलचे सर्व भाग आता देशातच बनवले जातील.
31 डिसेंबरपूर्वी पहिली ‘शेर’ रायफल लष्करात दाखल होणार
अमेठीतील इंडियन रशियन रायफल प्रॉडक्शन लिमिटेड (IRRPL) या संयुक्त कंपनीमार्फत 31 डिसेंबर 2025 पर्यंत पहिली पूर्ण स्वदेशी ‘शेर’ रायफल तयार करून लष्कराला पुरवण्यात येणार आहे. सध्या 50 टक्के भाग देशात तयार होत असून, ऑक्टोबरपर्यंत हा टक्का 70% वर पोहचणार आहे. वर्षाअखेरीस संपूर्ण उत्पादन स्वदेशी होणार आहे.
2026 पासून दरवर्षी 1.5 लाख रायफलांचे उत्पादन
2026 च्या मध्यापासून दरवर्षी 1.5 लाख रायफल्स तयार होतील. यातील 1.2 लाख रायफल्स थेट लष्कराला दिल्या जातील. IRRPL चे CEO मेजर जनरल एस.के. शर्मा यांनी सांगितले की, दर 100 सेकंदाला एक रायफल तयार होईल, असे उत्पादनाचे लक्ष्य आहे.
2030 पर्यंत 6 लाख रायफल्स लष्कराच्या ताफ्यात
समजुतेनुसार, 2022 ते 2032 या कालावधीत दरवर्षी 70,000 रायफल्स लष्कराला पुरवायच्या आहेत. मात्र उत्पादन गती वाढवून 2030 पर्यंतच 6 लाखांहून अधिक रायफल्स लष्कराला दिल्या जातील. याआधीच 48,000 रायफल्स भारतात तयार करून लष्कराला देण्यात आल्या आहेत.
शेर रायफलवर आंतरराष्ट्रीय बाजाराची नजर
पूर्व आशिया व आफ्रिकेतील अनेक देश ‘शेर’ रायफल खरेदीसाठी उत्सुक आहेत. तसेच देशातील विविध राज्यातील पोलीस दल आणि निमलष्करी दलांकडूनही याला मागणी आहे. पुढील वर्षांपासून दरवर्षी 30,000 रायफल्स निर्यात करण्याची तयारी आहे.
रशियाकडून नाव बदलास ना हरकत
‘एके-203’ रायफलला ‘शेर’ नावाने निर्यात करण्यास रशियाला कोणतीही हरकत नाही, असे मेजर जनरल शर्मा यांनी स्पष्ट केले. ब्रह्मोस क्षेपणास्त्र यशानंतर भारत-रशियातील हे दुसरे यशस्वी संयुक्त संरक्षण उत्पादन ठरेल.
गुणवत्तेवर कोणतीही तडजोड नाही
शेर रायफलची गुणवत्ता रशियात बनवलेल्या एके-203सारखीच राहणार आहे. कारण अमेठी येथील प्रत्येक रायफल 121 गुणवत्ता चाचण्या आणि टेस्ट फायरिंगनंतरच लष्करात पाठवली जात आहे.
