दिल्ली–बंगळुरू दरम्यानच्या एअर इंडियाच्या विमानात प्रवास करताना एका महिला प्रवाशाची प्रकृती अचानक बिघडली. तिच्या नाकातून सतत रक्तस्राव सुरू झाल्यानंतर केबिन क्रूने तातडीने मदत केली. फ्लाइट अटेंडंट्सनी प्राथमिक उपचार दिल्यानंतर पायलटने त्वरित निर्णय घेत विमान ठरलेल्या वेळेपेक्षा १६ मिनिटे आधी बंगळुरू विमानतळावर उतरवले. डॉक्टर आधीच विमानतळावर उपस्थित असल्याने महिलेवर लगेच उपचार सुरू झाले.
सोशल मीडियावरून प्रवासी मारिओ दा पेन्हा यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, माझ्या मागच्या सीटवर बसलेल्या महिलेची अचानक प्रकृती खालावली व तिच्या नाकातून मोठ्या प्रमाणात रक्त येऊ लागले. परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात घेत फ्लाइट अटेंडंट्सनी हातमोजे घालून तत्काळ उपचार सुरू केले आणि सर्व वैद्यकीय साहित्य नीटपणे वापरून व्यवस्थित विल्हेवाट लावले.
याबाबत दा पेन्हा यांनी आपल्या पोस्टमध्ये पायलट व क्रूच्या कौशल्याचे कौतुक केले आहे. ते म्हणाले की, फ्लाइटमध्ये प्रवाशांची सुरक्षितता राखण्यासाठी धैर्य आणि कौशल्याची गरज असते, जी नेहमी दुर्लक्षित केली जाते. पण या घटनेत एअर इंडियाच्या कर्मचार्यांनी दाखवलेली संवेदनशीलता आणि तत्परता स्तुत्य
आहे.
