Home » बोलणार नाही करून दाखवणार दुबेया कुटुंबाचे सांत्वनप्रसंगी डॉ. सुजय विखे यांचे सूचक विधान

बोलणार नाही करून दाखवणार दुबेया कुटुंबाचे सांत्वनप्रसंगी डॉ. सुजय विखे यांचे सूचक विधान

 

श्रीरामपूर (प्रतिनिधी):

शहरातील तरुण उद्योजक आकाश दुबे यांच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार तथा भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी दुबे कुटुंबीयांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

यावेळी त्यांनी आकाश दुबे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत कुटुंबीयांचे सांत्वन केले. गेल्या काही दिवसांपासून आकाश दुबे हत्याप्रकरणामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून विविध राजकीय, सामाजिक आणि व्यापारी संघटनांकडून या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे.

या पार्श्वभूमीवर डॉ. विखे पाटील यांनी दुबे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. तसेच या प्रकरणातील न्यायप्रक्रियेसंदर्भात आवश्यक ती सर्व मदत करण्याची ग्वाही दिली.

भेटीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना डॉ. सुजय विखे पाटील यांनी सविस्तर भाष्य करण्याचे टाळले. मात्र त्यांनी, “ज्यांना बोलायचे ते बोलले, ही बोलण्याची वेळ नाही. जे काही करायचे आहे ते मी कृतीतून करून दाखवीन,” अशी सूचक प्रतिक्रिया दिली.

त्यांच्या या वक्तव्याची शहराच्या राजकीय व सामाजिक वर्तुळात विविध स्तरांवर चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, आकाश दुबे यांच्या हत्याप्रकरणानंतर श्रीरामपूरमधील वाढत्या गुन्हेगारीबाबत नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना व्यक्त होत आहे. शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी सातत्याने होत असून, डॉ. विखे पाटील यांच्या भेटीनंतर गुन्हेगारीविरोधात ठोस पावले उचलली जातील, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *