त्रिकोणी मालिकेच्या अंतिम सामन्यात भारताच्या महिला क्रिकेट संघाने यजमान श्रीलंकेविरुद्ध फलंदाजी करताना 50 षटकांत 7 गडी गमावत 342 धावा फटकावल्या. सलामीवीर स्मृती मंधानाने शानदार शतक झळकावत इतिहास रचला. मंधानाच्या या खेळीने भारत महिलांच्या वनडे क्रिकेटच्या अंतिम सामन्यात 340+ धावा करणारा दुसरा संघ ठरला आहे.
शतकवीर मंधानाने रचला विक्रम
स्मृती मंधानाने वनडे कारकिर्दीतील आपले अकरावे शतक झळकावले. तिने 102 चेंडूत 15 चौकार आणि 2 षटकारांसह 116 धावा केल्या. हे शतक करताच ती इंग्लंडच्या टॅमी ब्यूमोंटला मागे टाकत महिला वनडे इतिहासातील सर्वाधिक शतक करणाऱ्या खेळाडूंमध्ये तिसऱ्या स्थानावर आली आहे. तिच्यापुढे आता फक्त ऑस्ट्रेलियाची मेग लॅनिंग (15 शतकं) आणि न्यूझीलंडची सूझी बेट्स (13 शतकं) आहेत.
भारताने गाठला ऑस्ट्रेलियाच्या क्लबमध्ये प्रवेश
या सामन्यात भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने टॉस जिंकत पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्मृती मंधाना आणि प्रतिका रावलने डावाची धडाकेबाज सुरुवात करत 70 धावांची भागीदारी केली. प्रतिका रावल 30 धावा करून माघारी परतली, तर मंधाना मात्र टिकून राहून अर्धशतक आणि नंतर शतकात रूपांतर केले.
महिला वनडे फायनलमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक स्कोर
भारतीय महिला संघाने 342 धावा करत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. हे महिला वनडे फायनलमधील दुसरे सर्वात मोठे स्कोर आहे. याआधी 3 एप्रिल 2022 रोजी ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्ध ICC महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत 356/5 धावा केल्या होत्या.
महिला वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक करणाऱ्या फलंदाजः
मेग लॅनिंग (ऑस्ट्रेलिया) – 15
सूझी बेट्स (न्यूझीलंड) – 13
स्मृती मंधाना (भारत) – 11
टॅमी ब्यूमोंट (इंग्लंड) – 10