14 वर्षांच्या शानदार टेस्ट प्रवासावर पडदा
विराट कोहलीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून एक भावनिक पोस्ट शेअर करत टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची बातमी दिली. त्याच्या 14 वर्षांच्या टेस्ट करिअरमध्ये कोहलीने 123 सामन्यांत 30 शतकं आणि 31 अर्धशतकांच्या मदतीने एकूण 9,230 धावा केल्या. त्याने 2011 मध्ये आपला पहिला टेस्ट सामना खेळला होता.
रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर आता विराट कोहलीनेही इंग्लंड दौऱ्यापूर्वी टेस्ट क्रिकेटमधून माघार घेतल्याने, इंग्लंड दौऱ्यासाठी नव्या भारतीय संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे.
याआधी काही अहवालांमध्ये असा दावा करण्यात आला होता की कोहली टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार करत आहे. काही दिग्गज खेळाडूंनी त्याला इंग्लंड मालिकेपर्यंत खेळण्याची विनंतीही केली होती.
सोशल मीडियावर कोहलीची भावनिक पोस्ट
कोहलीने एक फोटो शेअर करत लिहिले,
“बॅगी ब्लू घालून टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केल्याला आज 14 वर्षे झाली. खरं सांगायचं तर, या प्रवासाची मी कल्पनाही केली नव्हती. टेस्ट क्रिकेटने मला घडवलं, अनेक कठीण प्रसंगांतून शिकवलं आणि आयुष्यभर सोबत राहणाऱ्या गोष्टी दिल्या.”
तो पुढे म्हणतो,
“पांढऱ्या कपड्यांमध्ये खेळणं ही एक वैयक्तिक अनुभूती असते – शांत वातावरण, लांब खेळाचे दिवस आणि अशा अनेक क्षणांची साखळी जी जरी लोकांना दिसत नाहीत, तरी ती आयुष्यभर लक्षात राहतात. आता या प्रवृत्तीतून बाहेर पडणं सोपं नाही – पण योग्य वाटतंय.”
“मी या खेळात माझं सर्व काही दिलं आहे आणि या खेळाने मला अपेक्षेपेक्षा जास्त दिलं आहे. मी पूर्ण मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो – या खेळासाठी, माझ्यासोबत खेळणाऱ्या प्रत्येकासाठी, आणि मला पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी.”
पोस्टच्या शेवटी कोहलीने लिहिले,
“मी माझ्या टेस्ट कारकीर्दीकडे कायम हसतमुखाने पाहीन. 269, साईनिंग ऑफ.”
विराट कोहलीचा वैभवशाली टेस्ट कारकीर्द
कोहलीने टेस्ट क्रिकेटमध्ये 123 सामन्यांत 210 डावांत खेळून 13 वेळा नाबाद राहत 9,230 धावा केल्या. त्याची सरासरी 46.85 इतकी होती. 30 शतकं आणि 31 अर्धशतकं त्याच्या नावावर आहेत. त्याच्या टेस्ट कारकिर्दीत अनेक विक्रम कोहलीने आपल्या नावावर केले आहेत.
सध्या कोहली वनडे क्रिकेट खेळत राहणार आहे, पण टेस्ट आणि T20 आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमधून आता तो दूर झाला आहे.