मुंबई – शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ऑप्शन ट्रेडिंगमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. निफ्टी आणि बँक निफ्टी यांची साप्ताहिक एक्सपायरी आता गुरुवारी न होता दुसऱ्या दिवशी होऊ शकते. सेबी (भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ) प्रत्येक शेअर बाजारासाठी वेगवेगळा एक्सपायरी दिवस ठेवण्याचा विचार करत आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) ने मंगळवार हा दिवस एक्सपायरीसाठी निवडला आहे. सेबी लवकरच यावर अंतिम निर्णय घेऊ शकते. याआधी सेबीच्या सल्लागार समितीच्या बैठकीत या मुद्द्यावर चर्चा झाली होती.
सध्या निफ्टीची साप्ताहिक एक्सपायरी प्रत्येक गुरुवारी होते, तर मासिक एक्सपायरी महिन्याच्या अखेरच्या गुरुवारी होते. पण सेबीच्या नवीन प्रस्तावांनुसार, निफ्टीची साप्ताहिक एक्सपायरी मंगळवारी आणि बँक निफ्टीची सोमवारी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, रिटेल गुंतवणूकदारांना ऑप्शन ट्रेडिंगमध्ये मोठे नुकसान होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, सेबीने यावर मर्यादा आणण्यासाठी काही पावले उचलली आहेत. रेटिंग एजन्सी ICRA च्या अहवालानुसार, या उपाययोजनांमुळे ऑप्शन डेरिव्हेटिव्हज आणि ट्रेडिंग वॉल्युममध्ये घट झाली आहे.
नोव्हेंबर 2024 पासून मार्च 2025 दरम्यान, दररोजचा प्रीमियम टर्नओव्हर एप्रिल ते नोव्हेंबर 2024 च्या तुलनेत 18% ने घसरला. तसेच या काळात केलेल्या ऑप्शन कांट्रॅक्ट्समध्ये तब्बल 60% घट झाली आहे.
हा बदल केवळ नियामक दृष्टीकोनातून नसून गुंतवणूकदारांच्या हितासाठी आणि बाजारातील स्थिरतेसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.