गुरुवारी शेअर बाजारात मोठी घसरण (Share Market Crash) झाली आहे. यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेला २५ टक्के टॅरिफ आहे, ज्यामुळे अनेक क्षेत्रांवर परिणाम होणार आहे. आज सकाळच्या सुरुवातीच्या काही मिनिटांतच गुंतवणूकदारांचे ५ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे लाखो कोटींचे नुकसान
नवी दिल्ली – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १ ऑगस्टपासून भारतातून होणाऱ्या आयातीवर २५% टॅरिफ आणि पेनल्टी लावण्याची धमकी (Trump Tariff Impact) दिल्यानंतर गुरुवारी भारतीय बेंचमार्क निर्देशांकात मोठी घसरण झाली. याचा परिणाम असा झाला की, सेन्सेक्स सकाळी १० वाजेपर्यंत ५४२.६६ पॉइंट्स किंवा ०.६७ टक्क्यांनी घसरून ८०,९३९.२० वर पोहोचला.
सकाळी ९:२० वाजेपर्यंत, बीएसई सेन्सेक्स ६०४ अंकांनी किंवा ०.७४% नी खाली आला, ज्याचा अर्थ असा की बीएसईमध्ये लिस्टेड कंपन्यांचे एकूण बाजार भांडवलीकरण ५.५ लाख कोटी रुपयांनी घटून ४५३.३५ लाख कोटी रुपये झाले. ही गुंतवणूकदारांच्या संपत्तीत झालेली मोठी घट आहे.
या क्षेत्रांमध्ये झाली सर्वाधिक घसरण
सेक्टोरल पातळीवर, निफ्टी ऑटो १% नी घसरला, तर बँकिंग, मेटल, फार्मा आणि रिअल्टी निर्देशांकही लाल चिन्हात व्यवहार करत होते. मात्र, आज शेअर बाजारात झालेल्या घसरणीची अनेक कारणं असू शकतात. ट्रम्प टॅरिफशिवाय अमेरिकन फेडरल रिझर्व्हने सलग पाचव्या बैठकीत व्याजदरात कोणताही बदल न करण्याचा घेतलेला निर्णय हे देखील एक कारण आहे.
याशिवाय फेड चेअरमन जेरोम पॉवेल यांच्या टिप्पणींमुळे सप्टेंबरमध्ये व्याजदर कपात होईल की नाही यावर अनिश्चितता निर्माण झाली असून, त्यांनी सांगितले की सध्या असा निर्णय घेणे घाईचे ठरेल.
क्रूड ऑईलही झाले महाग
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया-युक्रेन संघर्षाशी संबंधित टॅरिफ धमक्या दिल्यानंतर पुरवठा खंडित होण्याच्या भीतीमुळे गुरुवारी कच्च्या तेलाच्या किमती स्थिर राहिल्या. मात्र, अमेरिकेतील कच्च्या तेलाच्या साठ्यात अचानक झालेल्या वाढीमुळे किंमती वाढण्यात अडथळा आला.
ब्रेंट क्रूड सुमारे ७३ डॉलर प्रति बॅरल दरम्यान राहिले, तर WTI ७० डॉलरच्या थोडं खाली व्यवहार करत होते. मागील सत्रात दोन्ही बेंचमार्कमध्ये १% वाढ झाली होती, मात्र सध्याच्या भू-राजकीय तणाव आणि मिश्र साठा आकडेवारीमुळे ट्रेडर्स सतर्क राहिले आहेत.
