Home » पुणे गुन्हे वार्ता: वैष्णवी हगवणे प्रकरणात जालिंदर सुपेकर उघड; मामांच्या सहीने शशांक आणि सुशील हगवणेला शस्त्र परवाना, धक्कादायक माहिती समोर वैष्णवी हगवणे आत्महत्येप्रकरणी नवे तपशील समोर; हगवणे भावांना शस्त्र परवाना मिळवून देण्यात मामांचा सहभाग उघड

पुणे गुन्हे वार्ता: वैष्णवी हगवणे प्रकरणात जालिंदर सुपेकर उघड; मामांच्या सहीने शशांक आणि सुशील हगवणेला शस्त्र परवाना, धक्कादायक माहिती समोर वैष्णवी हगवणे आत्महत्येप्रकरणी नवे तपशील समोर; हगवणे भावांना शस्त्र परवाना मिळवून देण्यात मामांचा सहभाग उघड

पुणे : वैष्णवी हगवणे आत्महत्येच्या प्रकरणात नवे धक्कादायक खुलासे होत असून, शशांक आणि सुशील हगवणे या भावांनी खोटे पत्ते दाखवून शस्त्र परवाना घेतल्याचा आरोप आहे. याबाबत शशांकवर वारजे आणि सुशीलवर कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे दोघे पौड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात राहतात, त्यामुळे त्यांनी 2022 मध्ये पुणे ग्रामीण पोलीसांकडे परवान्यासाठी अर्ज केला होता. मात्र, तो फेटाळण्यात आला.

यानंतर या भावांनी पुणे शहरातील बनावट पत्त्यांची नोंद केली आणि खोट्या भाडेकराराच्या आधारे शस्त्र परवाना मिळविला. शशांकने वारजेला, तर सुशीलने कोथरुडला राहत असल्याचे भासवले. त्या आधारावर त्यांनी शस्त्र परवाना मिळवून पिस्तूल खरेदी केली.

शस्त्र परवाना मंजुरीवेळी जालिंदर सुपेकर होते अतिरिक्त पोलीस आयुक्त

शस्त्र परवाने मंजूर होतानाच्या कालावधीत जालिंदर सुपेकर हे पुणे शहर पोलीस दलात अतिरिक्त आयुक्तपदावर होते. पुणे ग्रामीण पोलिसांनी परवान्याला नकार दिल्यानंतर हगवणे बंधूंनी शहर पोलिसांकडे अर्ज केला आणि त्यावर सुपेकर यांच्या सहीची नोंद आहे. त्यामुळे हे परवाने मंजूर करण्यात सुपेकर यांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे समोर आले आहे.

फसव्या पत्त्यावर परवाने, सुपेकर यांच्या सहीचा उल्लेख

दोघा भावांनी 2022 मध्ये पुणे शहरात बनावट पत्ते वापरून अर्ज केले. त्यावेळी पोलीसांनी पत्त्यांची खातरजमा केली नाही. सुपेकर हे त्या काळात परवाना मंजुरीसाठी असलेल्या समितीतील सदस्य होते. त्यांनी आपली सही अर्जावर करून परवान्यांना मान्यता दिली. समितीत पाच सदस्य असतात: पोलीस आयुक्त, सह आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त (प्रशासन) आणि लायसन्स विभागातील अधिकारी. या प्रक्रियेत सुपेकर यांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडून मंजुरी घेतल्याची माहिती पुढे आली आहे.

गृह विभागाची कारवाई; सुपेकर यांच्याकडून अतिरिक्त जबाबदाऱ्या काढून घेतल्या

या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर गृह विभागाने जालिंदर सुपेकर यांच्यावर कारवाई करत त्यांच्याकडील नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरच्या कारागृह उपमहानिरीक्षकपदाची अतिरिक्त जबाबदारी काढून घेतली आहे. सुपेकर यांनी यापूर्वीच स्पष्ट केलं होतं की, वैष्णवी हगवणे आत्महत्या आणि शस्त्र परवाना प्रकरणाशी त्यांचा कोणताही संबंध नाही.

जालिंदर सुपेकर यांचे स्पष्टीकरण

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र हगवणे यांच्या सूनबाई वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यू प्रकरणात हगवणे कुटुंबीयांना मदत केल्याचा आरोप सुपेकर यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केलं होतं की, गेली दोन वर्षे ते तुरुंग विभागात कार्यरत असून पोलिस दलात त्यांचा कोणताही अधिकार नाही. कोणालाही कोणतेही निर्देश दिले नसल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच शस्त्र परवाना देण्यात आपण सहभागी नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *