नाशिक – मुंबईत घडलेल्या रेल्वे अपघातानंतर नाशिकरोड रेल्वे स्थानकावरही सोमवारी आणखी एक धक्कादायक दुर्घटना घडली. हरिद्वार एक्स्प्रेसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना एका प्रवाशाचा हात सटकून तो खाली पडला. यामध्ये तो प्रवासी गंभीर जखमी झाला आहे.
या घटनेमुळे काही वेळासाठी स्टेशनवर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जखमीला उपचारासाठी रुग्णालयात हलवले. या प्रवाशाची ओळख अद्याप पटलेली नाही.
रेल्वे अधिकारी सुनील अहिरे यांनी सांगितले की, “हरिद्वार एक्स्प्रेसमध्ये चढताना प्रवाशाचा हात सटकून तो अडकला होता. आम्ही तात्काळ चेन ओढून गाडी थांबवली आणि त्याला बाहेर काढून रुग्णालयात दाखल केलं.”
—
मुंबई लोकल अपघात: पाठीमागून धक्क्यामुळे पाच प्रवासी रेल्वे रुळांवर कोसळले, चौघांचा मृत्यू
मुंबई – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू तर 9 प्रवासी जखमी झाले आहेत.
मध्य रेल्वेमार्गावर दोन लोकल ट्रेन अगदी समांतर धावत होत्या. त्यात दरवाज्याजवळ उभे असलेले प्रवासी एकमेकांना धडकल्यामुळे काहीजण थेट ट्रॅकवर कोसळले. दोन्ही लोकलमध्ये प्रवास करणाऱ्यांच्या बॅगांमध्ये घर्षण झाल्याने ही घटना घडल्याचे प्राथमिक अंदाज आहेत.
अपघातानंतर घटनास्थळी तत्काळ ॲम्ब्युलन्स दाखल झाल्या आणि जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रेल्वे प्रशासन या घटनेचा सखोल तपास करत आहे.