Home » उद्धव ठाकरे यांचा पक्षनेत्यांना आदेश : मनसेसोबत युतीच्या शक्यतेवर जिल्हास्तरावर अभ्यास करा, एक महिन्यात अहवाल सादर करा

उद्धव ठाकरे यांचा पक्षनेत्यांना आदेश : मनसेसोबत युतीच्या शक्यतेवर जिल्हास्तरावर अभ्यास करा, एक महिन्यात अहवाल सादर करा

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुख यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी मनसेसोबत युतीसंदर्भात सकारात्मक भूमिका घेतली असून, स्थानिक पातळीवर युती किंवा आघाडी शक्य आहे का, याचा सविस्तर आढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत.

जर युती किंवा आघाडी होऊ शकली नाही, तर प्रत्येक मतदारसंघात स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्यास पक्ष सज्ज असावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. या संदर्भातील अहवाल येत्या महिन्याभरात सादर करण्याचे आदेशही त्यांनी संबंधित नेत्यांना दिले.

मनसेसोबत युतीबाबत चर्चा सुरु – निर्णय स्थानिक समीकरणांवर आधारित

उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले की, मनसेसोबत युतीसंदर्भात पक्ष सकारात्मक आहे. मात्र अंतिम निर्णय स्थानिक पातळीवरील परिस्थितीचा अभ्यास करूनच घेतला जाईल. कोणत्या भागात युती किंवा आघाडी करणे फायदेशीर ठरेल, याचे विश्लेषण करण्याचे निर्देश जिल्हाप्रमुखांना देण्यात आले आहेत.

फर्जी मतदारांचा शोध घ्या – मतदार याद्यांचा सखोल अभ्यास करा

विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी मतदार याद्यांचा बारकाईने अभ्यास करण्यास उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर मतदारांची वाढ नेमकी कशी झाली? कुठे वाढ झाली? 40 लाख मतदार कुठून वाढले याचा तपास करा, बोगस नावांची माहिती मिळवा, अशा सूचना त्यांनी गटप्रमुख आणि जिल्हाप्रमुखांना दिल्या.