Home » “ऑपरेशन सिंदूर” मधील लीक माहितीचा गुत्ता – नौदलातील क्लार्क विशालने ISI साठी केली हेरगिरी, संशयास्पद व्यवहार उघड

“ऑपरेशन सिंदूर” मधील लीक माहितीचा गुत्ता – नौदलातील क्लार्क विशालने ISI साठी केली हेरगिरी, संशयास्पद व्यवहार उघड

राजस्थान सीआयडीने नौदलाच्या दिल्ली मुख्यालयातील क्लार्क विशाल याला पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI साठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. त्याच्या बँक खात्यांतून सुमारे 1.50 लाख रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान 50 हजार रुपयांचा विशिष्ट व्यवहारही समाविष्ट आहे. फॉरेन्सिक तपासणीद्वारे पाकिस्तानला सामरिक माहिती पाठवण्यात आली असल्याची खात्री झाली आहे.

दिल्लीहून अटक, मानेसरमध्ये सापडली कार

विशाल 16 जून रोजी दिल्लीहून आपल्या घरी रेवाडीकडे स्वत:च्या कारने निघाला होता. त्यानंतर तो अचानक बेपत्ता झाला. 22 जून रोजी त्याने चुलत भावाला फोन करून सांगितले की, तो फिरायला गेला असून दोन दिवसांत घरी परतणार आहे. मात्र, यानंतर त्याचा मोबाईल ट्रॅकिंगवर लावल्यावर शेवटचा लोकेशन मानेसर येथे आढळला.

कुटुंबीय मानेसरला पोहोचले असता तिथे विशालची कार उभी होती. स्थानिकांकडून विचारपूस केल्यावर समजले की काही व्यक्तींनी विशालला बोलेरो गाडीतून घेऊन गेले. एका व्यक्तीने गाडीचा नंबर लिहून ठेवला होता आणि पुढील तपासात ही गाडी जयपूर इंटेलिजन्स विभागाच्या अधिकाऱ्याच्या नावे असल्याचे स्पष्ट झाले.

कुटुंबाची पार्श्वभूमी व वैयक्तिक माहिती

विशाल मूळचा हरियाणाच्या रेवाडी जिल्ह्यातील पुंसिका गावचा आहे. सध्या तो रेवाडी शहरात आपल्या कुटुंबासह राहत होता. त्याच्या वडिलांचा अपघाती मृत्यू झाला होता आणि ते एएसआय पदावर होते. दोन चाचा हरियाणा पोलीस सेवेत होते, त्यातील एक निवृत्त झाला आहे. त्याचा चुलत भाऊ मर्चंट नेव्हीत होता, जो 2018 पासून मलेशियातून बेपत्ता आहे.

सेनाभरती ते हेरगिरीपर्यंतचा प्रवास

विशालने 2019 मध्ये वायुदलात क्लार्क म्हणून भरती घेतली होती. तो दिल्लीतील मुख्यालयात नियुक्त होता. 2022 मध्ये राजस्थान सीआयडीने ‘प्रिया’ नावाच्या एका महिलेशी संबंधित गुप्तचर प्रकरणात दोन जणांना अटक केली होती. त्याच दरम्यान विशाल ‘प्रिया’च्या सोशल मीडियावर मित्र यादीत आढळून आला.

तपास यंत्रणांनी त्याची प्रोफाइल तपासून त्याच्या नौदलातील नियुक्तीची माहिती घेतली आणि त्याच्यावर लक्ष ठेवायला सुरुवात केली. यानंतर त्याच्या खात्यात पाकिस्तानातून काही व्यवहार झाले आणि “ऑपरेशन सिंदूर” दरम्यान अचानक 50 हजार रुपयांचा व्यवहार झाल्याने तो संशयाच्या भोवऱ्यात आला.

फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्रामवरील चॅटिंगमधून पाकशी संपर्काचा उलगडा

विशालच्या फोनची फॉरेन्सिक तपासणी करण्यात आली असून त्यातून पाकिस्तानी हँडलर्ससोबत फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम आणि इतर इंटरनेट प्लॅटफॉर्म्सवर झालेल्या संवादाचा तपशील मिळाला आहे. त्याच्या बँक खात्यातील व्यवहार, सोशल मीडियावरील संवाद आणि सामरिक माहिती पाकिस्तानला पाठवली गेल्याचे पुरावे सापडल्याने त्याला अटक करण्यात आली.