Home » पुणेच्या नानावरे चौकातील प्रचंड ट्राफिकजॅममुळे नागरिक त्रस्त — नेते गप्प का?

पुणेच्या नानावरे चौकातील प्रचंड ट्राफिकजॅममुळे नागरिक त्रस्त — नेते गप्प का?

पुणे : बिटवाईज टॉवरजवळील नानावरे चौकात गेली तीन वर्षं दररोज सकाळी व संध्याकाळी दोन ते दोन तास प्रचंड ट्राफिकजॅम होतो आहे. हजारो नागरिकांना या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असून, यामुळे रुग्ण, विद्यार्थी, कामगार, व्यापारी, वयोवृद्ध आणि अगदी स्थानिक राजकारणीही हैराण झाले आहेत.

या भागाचे पालकमंत्री अजित पवार आणि स्थानिक आमदार व मंत्री चंद्रकांत पाटील यांना ही परिस्थिती माहिती असूनही कोणतीही ठोस कारवाई अद्याप करण्यात आलेली नाही. नागरिक विचारत आहेत — “नेते निवडणुकीपूर्वी आवाज करतात, आता कुठे आहेत?”

मोठ्या मॉलच्या बांधकामामुळे आणखी बोजा

या क्षेत्रात सध्या ५ एकर क्षेत्रावर भव्य मॉलचे बांधकाम सुरू आहे. या मॉलमुळे येत्या काळात वाहतुकीवर आणखी प्रचंड ताण पडणार आहे. आधीच अरुंद टनेल आणि चौकात गोंधळ असताना हा नवीन मॉल म्हणजे जणू शहर रस्त्यांवरचा मृत्युघंटा!

रुग्णवाहिका अडकतात, जीव धोक्यात

या चौकात प्रसिद्ध यूरोकुल हॉस्पिटल आहे. तिथून निघणाऱ्या रुग्णवाहिका अनेक वेळा जॅममध्ये अडकतात. काही वेळा गंभीर रुग्णांनी वेळेवर उपचार न मिळाल्याने जीव गमावल्याच्या घटनाही घडल्या आहेत. प्रशासनाला याचे गांभीर्य नसेल, तर कोणाला असेल?

विद्यार्थी आणि सामान्य लोक त्रस्त

शाळेत जाणारे विद्यार्थी वेळेवर पोहोचत नाहीत. घरी परतताना ते इतके थकून जातात की अभ्यास करण्याची ताकदही राहत नाही. नोकरदार वर्ग, महिला, वृद्ध नागरिक, सर्वच या अकार्यक्षम व्यवस्थेमुळे त्रस्त झाले आहेत.

राजकारणी आणि पोलिसही अडकतात — तरी उपाय नाही?

या चौकात अनेकदा आमदार, पोलिस अधिकारी आणि स्थानिक राजकारणी स्वतः अडकलेले आहेत. पण तरीही त्यांनी आजवर ठोस उपाययोजना का केली नाही? जनता विचारते आहे — “म्हणजे आम्ही रोज अडकत राहायचं आणि तुम्ही निवडणुकीनंतर हरवल्यासारखे?”

उपाय सोपा आहे — इच्छाशक्ती आणि निधीची गरज

या भागात मोठा बोगदा किंवा उड्डाणपूल (फ्लायओव्हर) बांधणे काही अशक्य नाही. फक्त प्रशासनाने इच्छाशक्ती दाखवली आणि सरकारने निधी दिला, तर तीन महिन्यात या भागाला ट्राफिकमुक्त करता येईल. पण प्रश्न एकच — “नागरिकांचे प्रश्न ऐकणारा नेता आहे का?”

जनतेचा प्रश्न नेत्यांना :

अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांना ही परिस्थिती माहिती असूनही ते गप्प का?

दरवर्षी कोट्यवधींचा निधी कुठे जातो?

प्रशासन काय झोपलंय का?

अजून किती जणांचा जीव जाईल, तेव्हा उपाय केला जाईल का?