जम्मू : जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड़ जिल्ह्यातील परेड-चाशोटी परिसरात झालेल्या ढगफुटीमुळे मोठी आपत्ती ओढावली आहे. आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ढगफुटीनंतर अचानक आलेल्या पुरामुळे लंगर शेड (सामुदायिक स्वयंपाकघर) वाहून गेलं. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी घटनास्थळाचा आढावा घेत बचाव पथकांना तातडीने रवाना केलं आहे. नुकसानीचं मूल्यांकन आणि आवश्यक वैद्यकीय व बचाव व्यवस्थाही सुरू आहे.
पूरात यात्रेचा मार्गही बाधित
पूरग्रस्त भागातून माचैल माता यात्रेची सुरुवात होते. या परिसरात लहान मुलं, वयोवृद्ध भाविक यांच्यासह मोठी गर्दी होती. किश्तवाड़चे जिल्हाधिकारी पंकज शर्मा यांनी सांगितलं की, पूर आल्यावर लगेचच बचाव मोहीम सुरू करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी पीडित कुटुंबांना संवेदना व्यक्त करून जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली. नागरी पोलिस, सेना, एनडीआरएफ आणि एसडीआरएफला तातडीने मदत व बचावकार्य करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हवामान विभागाचा अंदाज
श्रीनगर हवामान केंद्राने पुढील ४ ते ६ तासांत जम्मू-काश्मीरच्या अनेक भागांत मध्यम ते मुसळधार पाऊस, विजांच्या कडकडाटासह वादळी वारे येण्याची शक्यता वर्तवली आहे. कुपवाडा, बारामुल्ला, बांदीपोरा, श्रीनगर, गंधर्बल, बडगाम, पुंछ, राजौरी, रियासी, उधमपूर, डोडा, किश्तवाड़सह काझीगुंड-बनिहाल-रामबन पट्ट्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. डोंगराळ व संवेदनशील भागांत अचानक पूर, ढगफुटी, भूस्खलन व दरड कोसळण्याची शक्यता असल्याने नागरिकांना विजेचे खांब, तारा व जुन्या झाडांपासून दूर राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
ढगफुटी म्हणजे नेमकं काय?
ढगफुटी म्हणजे अतिशय कमी वेळेत आणि लहान भौगोलिक क्षेत्रात होणारी अत्यंत मुसळधार पर्जन्यवृष्टी. डोंगराळ प्रदेशात ही घटना वारंवार घडते व त्यामुळे अचानक पूर आणि भूस्खलनाचा धोका वाढतो. ढगफुटीमध्ये साधारण एका तासात १०० मिमी (४ इंच) किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस पडतो. उबदार ओलसर हवा पर्वतांवरून वेगाने वर जाते, थंड होऊन मुसळधार पावसात रूपांतरित होते – या प्रक्रियेला ऑरोग्राफिक लिफ्ट म्हणतात. त्यामुळे अल्पावधीतच प्रचंड पर्जन्य होतो आणि ढगफुटीसदृश स्थिती नि
र्माण होते.
