गांधीनगर : बनासकांठा जिल्ह्यातील एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण गुजरात हादरली आहे. १८ वर्षीय वैद्यकीय शिक्षण घेण्याचं स्वप्न पाहणारी चंद्रिका चौधरी हिचा खून तिच्याच वडील सेधाभाई आणि काका शिवाभाई पटेल यांनी केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दोन्ही काकांना अटक केली असून, वडिलांचा शोध सुरू आहे, अशी माहिती सहाय्यक पोलिस अधीक्षक सुमन नाला यांनी दिली.
प्रेमसंबंधावरून निर्माण झाला राग
चंद्रिका आणि हरेश चौधरी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. मात्र, तिच्या कुटुंबाला हा संबंध मान्य नव्हता. त्यांनी तिचं लग्न दुसरीकडे लावण्याचा प्रयत्न केला. २४ जूनच्या रात्री चंद्रिकेने हरेशला इन्स्टाग्रामवर मेसेज करून मदतीची याचना केली – “मला घेऊन चल, नाहीतर माझं कुटुंब माझ्या इच्छेविरुद्ध लग्न लावेल. मी नकार दिला तर ते मला ठार मारतील.”
अचानक मृत्यू, संशय आणि तक्रार
मेसेजनंतर काही तासांतच चंद्रिकेचा मृतदेह घरात सापडला. सुरुवातीला कुटुंबाने हा मृत्यू हृदयविकाराचा झटका असल्याचं सांगून अंत्यसंस्कार घाईघाईत पूर्ण केले. पण हरेशला हा प्रकार संशयास्पद वाटला आणि त्याने पोलिसांकडे तक्रार दिली. त्यापूर्वीच, चंद्रिकेला धोका असल्याची याचिका त्याने न्यायालयात दाखल केली होती, परंतु सुनावणीपूर्वीच तिचा मृत्यू झाला.
पूर्वनियोजित कटाचा उलगडा
चौकशीत समोर आलं की चंद्रिकेने पूर्वी घरातून पळून हरेशसोबत राहण्याचा प्रयत्न केला होता, पण पोलिसांनी तिला परत आणलं. २४ जूनच्या रात्री लग्नास नकार दिल्यानंतर वडील आणि काकाने त्रिस्तरीय योजना रचली – प्रथम तिला दूधातून औषध देऊन बेशुद्ध केलं, नंतर गळा आवळून ठार मारलं आणि नंतर फासावर लटकवून आत्महत्येसारखा आभास निर्माण केला.
पोलिसांच्या मते, तांत्रिक पुरावे आणि जबाबांमधील विरोधाभासावरून हा स्पष्टपणे पूर्वनियोजित खून आहे. थरड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, दोन्ही काकांना अटक झाली आहे, तर वडिलांचा
शोध सुरू आहे.
