काठमांडू येथील नेपाळ सैन्य मुख्यालयाबाहेर अंतरिम पंतप्रधान निवडीच्या चर्चेदरम्यान जन-झेड गटांमध्ये संघर्ष उफाळून आला. केपी शर्मा ओली यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्याने ही खुर्ची रिकामी आहे. बलेंद्र शाह बालेन, माजी मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की आणि वीज मंडळाचे माजी प्रमुख कुलमान घिसिंग हे नावं चर्चेत असून अद्याप कोणावर ठाम निर्णय घेण्यात आलेला नाही.
पीएम पदावर निर्माण झाला अडथळा
केपी शर्मा ओली यांनी राजीनामा दिल्यानंतर पद रिक्त
पंतप्रधानपदाच्या शर्यतीत तीन दावेदार सर्वात पुढे
सुशीला कार्की नंतर कुलमान घिसिंगचे नाव चर्चेत
काठमांडूमध्ये बुधवारी संध्याकाळी वेगवेगळ्या उमेदवारांना पाठिंबा देणाऱ्या जन-झेड गटांमध्ये झटापट झाली. या पार्श्वभूमीवर अंतरिम नेता निवडण्याची चर्चा सुरू आहे.
शर्यतीतील प्रमुख चेहरे
पंतप्रधान पदासाठी तीन प्रमुख नावं समोर आली आहेत –
1. काठमांडूचे महापौर व रॅपर बलेंद्र शाह उर्फ बालेन
2. माजी मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की
3. वीज प्राधिकरणाचे माजी प्रमुख कुलमान घिसिंग
स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, सुशीला कार्कीनंतर घिसिंग यांचे नाव सर्वाधिक पुढे आहे. घिसिंग यांनी काठमांडू खोऱ्यातील दीर्घकाळ चालत आलेल्या लोडशेडिंग समस्येवर कायमस्वरूपी उपाय शोधल्याने त्यांना मोठी ओळख मिळाली.
कुलमान घिसिंग – इंजिनियर ते दावेदार
२५ नोव्हेंबर १९७० रोजी रामेछाप जिल्ह्यात जन्मलेले घिसिंग यांनी भारतातील जमशेदपूरच्या रीजनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग केले. त्यानंतर पुलचौक इंजिनियरिंग कॉलेज, नेपाळ येथे उच्च शिक्षण घेतले. पुढे त्यांनी एमबीए पूर्ण करून नेतृत्व कौशल्य अधिक प्रभावी केले.
अजूनही निर्णय नाही
धरानचे महापौर हरका राज संपंग उर्फ हरका संपंग यांचे नावही चर्चेत आहे. पण राष्ट्रपती रामचंद्र पौडेल आणि सेना प्रमुख यांच्यातील बैठका सुरू असून अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. राष्ट्रपतींनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
जन-झेड गटांमध्ये चकमकी
गुरुवारी बालेन समर्थक आणि सुशीला कार्की समर्थक यांच्यात तीव्र झटापट झाली. झालेल्या हिंसक संघर्षात सुमारे ३० जणांचा मृत्यू झाला आहे.
भ्रष्टाचार आणि सोशल मीडियावर निर्बंध याविरोधात सुरु असलेल्या आंदोलनामुळे ओली यांनी राजीनामा दिला होता. युवकांच्या नव्या सरकारच्या मागणीमुळे अंतरिम मंत्रिमंडळाच्या स्थापनेची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
