Home » नाशिकमध्ये डिजिटल अरेस्टचा सुळसुळाट! वृद्धांची फसवणूक करून सायबर ठगांनी उकळले तब्बल 6 कोटी आणि 72 लाख

नाशिकमध्ये डिजिटल अरेस्टचा सुळसुळाट! वृद्धांची फसवणूक करून सायबर ठगांनी उकळले तब्बल 6 कोटी आणि 72 लाख

 

नाशिक : सायबर ठग आता लोकांना फसवण्यासाठी नव्या पद्धतींचा अवलंब करत आहेत. ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली नाशिकमध्ये दोन ज्येष्ठ नागरिकांची तब्बल 6 कोटी आणि 72 लाख रुपयांनी फसवणूक झाल्याचे धक्कादायक प्रकार उघड झाले आहेत. या दोन्ही घटनांमध्ये ठगांनी आर्थिक गैरव्यवहार आणि अश्लील फोटो-व्हिडीओ व्हायरल झाल्याचे सांगून वृद्धांना धमकावले आणि त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळली.

 

याप्रकरणी विशेष म्हणजे, ठगांनी स्वतःला सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित अधिकारी असल्याचे भासवून, “भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या कोर्टात ऑनलाइन सुनावणीसाठी बोलावले आहे” असा खोटा दावा करत, पीडितांना भीती दाखवली. त्यामुळे घाबरलेल्या नागरिकांनी आरटीजीएसच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर केल्याचे समोर आले आहे.

 

पहिली घटना : 6 कोटींचा डिजिटल स्कॅम

नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातील एका ज्येष्ठ नागरिकाला व्हिडिओ कॉल आला. कॉल करणाऱ्याने त्यांच्या सिमकार्डवरून अश्लील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्याचे सांगून घाबरवले. सर्वोच्च न्यायालयात हजर राहावे लागेल असे सांगत, मोठ्या रकमेचा दंड भरावा लागेल अशी भीती दाखवण्यात आली. परिस्थितीने हादरलेल्या त्या नागरिकाकडून ठगांनी तब्बल 6 कोटी रुपये उकळले.

 

दुसरी घटना : क्रेडिट कार्ड घोटाळ्याचा बहाणा करून 72 लाखांची फसवणूक

दुसऱ्या घटनेत, अनिल लालसरे या ज्येष्ठ नागरिकाला फोनवर सांगण्यात आले की, त्यांच्या आधार क्रमांकावरून बनावट क्रेडिट कार्ड काढून मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला आहे. “दंड न भरल्यास सीबीआय अटक करून दिल्लीला घेऊन जाईल” अशी धमकी देत, लालसरे यांच्याकडून 72 लाख रुपये आरटीजीएसद्वारे वसूल करण्यात आले.

 

दोन्ही प्रकरणांमध्ये सायबर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून, तपास सुरू आहे. नागरिकांनी अशा प्रकारच्या कॉलवर विश्वास न ठेवण्याचे आणि तत्काळ सायबर हेल्पलाइनवर तक्रार करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.