महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषद आणि सिनेट निवडणुकांमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आपले निर्विवाद वर्चस्व कायम ठेवले आहे. दिनांक ७ जुलै २०२५ रोजी विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषद आणि सिनेट निवडणुका पार पडल्या. यामध्ये एकूण सात जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने या निवडणुकीत घवघवीत यश संपादन सिनेटच्या ३ पैकी २ पदांवर अभाविपचे अधिकृत उमेदवार पियूष निंबाळकर (नाशिक), उत्तरेश्वर दराडे (धुळे) हे विजयी झाले आहेत. विद्यार्थी परिषद निवडणुकीत अध्यक्ष पदावर अभाविप चे उमेदवार अभिजीत वाकचौरे (संगमनेर), उपाध्यक्ष पदावर सुजाता कांबळे (अंबेजोगाई) आणि सचिव पदावर चैतन्य कावळे (संगमनेर) हे विजयी झाले आहेत. अत्यंत चुरशीच्या लढतीत अभाविपने ८ पैकी ५ जागांवर विजय मिळवत नॅशनल इंटिग्रेेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) स्टुडंट्स चा दारुण पराभव केला आहे. वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी हे सिनेट व विद्यार्थी परिषदेचे प्रतिनिधी कटीबद्ध असणार आहेत. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अभाविप च्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. फटाके आणि ढोलताशांच्या गजरात विजयी उमेदवारांचे अभिनंदन करण्यात आले. यानंतर रा. स्व.संघ कार्यालय येथे सर्व विजयी उमेदवार आणि अभाविप कार्यकर्त्यांच्या माध्यमातून भारतमाता पूजन करण्यात आले. या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्या बद्दल महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे वर्तमान प्रभारी कुलगुरू डॉ.मिलिंद निकुंभ आणि विद्यापीठ प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांनी विजयी झालेल्या उमेदवार आणि अभाविपला शुभेच्छा दिल्या आहेत.
वैद्यकीय, नर्सिंग, आयुर्वेद, होमिओपॅथी, दंतवैद्यकीय आणि पॅरामेडिकलच्या विद्यापीठ व महाविद्यालय स्तरावरील समस्यांना वाचा फोडणे, महाविद्यालयीन परिसरात राष्ट्रीय विचारांचे बीजारोपण करत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करणे तसेच प्रवेश, परीक्षा आणि निकालांमध्ये होणारा विलंब टाळून सुसूत्रता आणणे इत्यादी विषयांवर आगामी कालावधी मध्ये या उद्दिष्टांना घेऊन हे विजयी उमेदवार काम करणार आहेत.
देशभरात झालेल्या सर्व छात्र संघ निवडणुकांमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आपला राष्ट्रीयत्वाचा विचार घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे. हीच परंपरा राखत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात देखील पुन्हा एकदा अभाविप विजयी झालेली आहे. महाराष्ट्रातील सर्व वैद्यकीय विद्यार्थ्यांनी अभाविपच्या उमेदवारांवर विश्वास दाखवत मतदान केल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार. विद्यार्थ्यांनी विद्यार्थी परिषदेवर दाखवलेला विश्वास नक्कीच सार्थ ठरेल, असे मत अभाविप पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री अथर्व कुलकर्णी यांनी व्यक्त केले आहे.
