Home » दहा वर्षांत कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे अर्थव्यवस्थेत लाखो कोटींची भर, सरकारचा अहवाल जाहीर

दहा वर्षांत कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे अर्थव्यवस्थेत लाखो कोटींची भर, सरकारचा अहवाल जाहीर

 

कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) मुळे रोजगार धोक्यात येतील अशी भीती व्यक्त केली जाते, मात्र त्याच वेळी एआयमुळे अर्थव्यवस्था वेगाने वाढून नवीन रोजगारही निर्माण होतील. नीति आयोगाच्या अहवालानुसार, सन 2035 पर्यंत एआय भारतीय अर्थव्यवस्थेत 1.4 ते 1.9 लाख कोटी डॉलरपर्यंतची भर घालू शकतो.

 

वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की देशातील प्रत्येक जिल्ह्यात एआय तंत्रज्ञानाचा वापर होणे आवश्यक आहे.

 

 

 

एआयमुळे लाखो कोटींची भर पडणार

 

१८ प्रमुख क्षेत्रांची निवड

 

विविध उत्पादनांच्या खर्चात घट शक्य

 

वित्तमंत्री व इलेक्ट्रॉनिक्स-आयटी मंत्र्यांनी अहवाल प्रसिद्ध केला

 

 

नवी दिल्ली प्रतिनिधी । एआयमुळे मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या गमावल्या जातील, असे वारंवार सांगितले जात आहे. मात्र, एआयमध्ये अर्थव्यवस्थेला चालना देण्याबरोबरच नोकरी निर्माण करण्याचीही प्रचंड क्षमता आहे.

 

भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी एआयचा मोठा हातभार लागू शकतो. याच पार्श्वभूमीवर नीति आयोगाने अहवाल तयार केला असून तो सोमवारी वित्तमंत्री निर्मला सीतारामन आणि इलेक्ट्रॉनिक्स व आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रसिद्ध केला.

 

 

 

अहवालात काय आहे?

 

रिपोर्टनुसार, 2035 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था ८ लाख कोटी डॉलरहून अधिक होण्याचा अंदाज आहे. या एकूण अर्थव्यवस्थेत एआय 1.4 ते 1.9 लाख कोटी डॉलरपर्यंत थेट योगदान देईल.

 

एआयच्या मदतीने अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी १८ क्षेत्रांची निवड करण्यात आली आहे.

 

 

 

कोणती क्षेत्रे महत्त्वाची?

 

यामध्ये मुख्यतः औषधनिर्मिती (फार्मा), सायबर सुरक्षा, वैद्यकीय उपकरणे, शहरी विकास, अणुऊर्जा, अवकाश तंत्रज्ञान, क्लाउड सेवा आणि औद्योगिक इलेक्ट्रॉनिक्स यांचा समावेश आहे.

 

अहवालानुसार, या क्षेत्रांमध्ये एआयचा वापर केल्याने उत्पादन खर्च कमी होईल. यामुळे भारत या क्षेत्रांमध्ये मोठा उत्पादक देश ठरेल आणि रोजगारनिर्मिती वाढेल.

 

 

 

एआयच्या शर्यतीत मागे राहणार नाही भारत

 

अहवाल प्रसिद्ध करताना सीतारामन म्हणाल्या की विकासासाठी एआयशी संबंधित तंत्रज्ञानाचा वापर देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये होणे आवश्यक आहे.

 

त्यांनी सांगितले की, भारत एआयच्या क्षेत्रात कुठल्याही परिस्थितीत मागे राहू शकत नाही आणि जगात नेतृत्व करण्यास सक्षम व्हायला हवे.

 

या वेळी वैष्णव म्हणाले की, एआय आपल्या कामकाजाच्या पद्धतीपासून जीवनशैलीपर्यंत सर्व काही बदलणार आहे. तरुणांच्या आत्मविश्वासाच्या जोरावर आपण विकसित भारताचे स्वप्न नक्कीच पूर्ण करू शकतो.