टीम इंडियाचा माजी आक्रमक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याने पुन्हा एकदा पाकिस्तानवर कडाडून टीका करत सोशल मीडियावर देशभक्तीचं वातावरण तयार केलं. त्याने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये भारत आणि पाकिस्तानच्या लष्कराच्या फोटोसह एक प्रभावी कॅप्शन शेअर केलं, जे काही क्षणांतच सोशल मीडियावर व्हायरल झालं. यापूर्वीही सेहवागने पाकिस्तानविरोधात कठोर वक्तव्यं केली आहेत.
सेहवागच्या स्टोरीमधून देशभक्तीचं प्रतिबिंब
वीरूने इन्स्टाग्रामवर पोस्ट करताना भारत आणि पाकिस्तानच्या सैन्य अधिकाऱ्यांचे फोटो टाकले आणि त्याखाली लिहिलं, “फरक खूप मोठा आहे. जय हिंदच्या सेनेला सलाम.” हे पोस्ट चाहत्यांमध्ये चांगलंच गाजलं आणि अनेकांनी ते शेअर करत वीरूचं समर्थन केलं.
शिखर धवननेही पाकिस्तानला सुनावलं
सेहवागप्रमाणेच माजी सलामीवीर शिखर धवननेदेखील सीजफायर उल्लंघनानंतर पाकिस्तानवर टीकेची झोड उठवली. त्याने आपल्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाउंटवर लिहिलं, “हा निकृष्ट देश नेहमीप्रमाणे आपली नीचता पुन्हा एकदा जगापुढे दाखवतोय.” त्यासोबतच त्याने पाकिस्तानला टॅग करत सीजफायरचा हॅशटॅगदेखील वापरला.
‘कुत्र्याची शेपटी वाकडीच’ – पाकिस्तानच्या वागणुकीवर क्रिकेटपटूंचा संताप
भारत आणि पाकिस्तान यांच्यात सीजफायरसाठी चर्चा झाल्यानंतर शांततेचा करार झाला होता. मात्र, पाकिस्तानने पुन्हा एकदा त्याचे उल्लंघन करत जम्मू-काश्मीरमध्ये गोळीबार केला. या सगळ्याची सुरुवात २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यापासून झाली होती, ज्यात २६ निरपराध नागरिकांचा जीव गेला.
भारतीय लष्कराची ठोस कारवाई – ऑपरेशन सिंदूर
भारतीय वायूसेनेने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळ नष्ट केले. लष्कराच्या DGMO लेफ्टनंट जनरल राजीव घाई यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, या ऑपरेशनमध्ये १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. यामध्ये युसूफ अजहर आणि अब्दुल मलिक रऊफ यांसारखे मोठे दहशतवादी सामील होते.
ही तळ मुरिदके, बहावलपूर, सियालकोट आणि मुजफ्फराबाद या भागांमध्ये होती. वीरेंद्र सेहवागने भारतीय लष्कराच्या या धाडसी कारवाईचे समर्थन करत देशवासीयांमध्ये अभिमान निर्माण केला.