Home » राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; रत्नागिरीत धुवांधार, मुंबईतही पावसाची हजेरी

राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; रत्नागिरीत धुवांधार, मुंबईतही पावसाची हजेरी

राज्यभरात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असून हवामान विभागाने आजपासून काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात आज जोरदार पावसाची शक्यता आहे, तर मराठवाड्यात मंगळवारपासून पावसाची सुरुवात होईल असा अंदाज आहे. मुंबईत रविवारी रात्रीपासून हलक्या सरी सुरू असून आकाशात काळे ढग दाटले आहेत. त्यामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून थोडासा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

2. रत्नागिरीत सकाळपासून पावसाची बरसात; वातावरणात गारवा

रत्नागिरी आणि परिसरात सोमवारी सकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अचानक पडलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली. गेल्या काही दिवसांपासून कोकणात अवकाळी पावसाचे प्रमाण वाढले आहे. रविवारी संध्याकाळी सह्याद्री पर्वतरांगांमध्येही पावसाने जोर धरला होता. विजेचा लपंडाव काही गावांमध्ये सुरू आहे. अंदमानमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर कोकणातही त्याचा प्रभाव जाणवू लागला आहे.

3. बुलढाण्यात पावसाचा जोर; जनजीवन विस्कळीत

बुलढाण्याच्या नांदुरा परिसरात मान्सूनपूर्व पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. वादळी वाऱ्यासह सुमारे दोन तास पडलेल्या पावसामुळे रेल्वे गेट नादुरुस्त झाला व वाहतूक तीन तास ठप्प झाली. परिणामी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. काही घरांची छप्परं उडाली असल्याचेही निदर्शनास आले.

4. राज्यात 17 ते 20 मेदरम्यान विजांसह पावसाचा अंदाज

हवामान खात्याच्या अंदाजानुसार 17 ते 20 मे दरम्यान कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. काही भागांत अतिवृष्टी होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. विदर्भातदेखील काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.