भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत केवळ तीन सामन्यांत खेळवले जाणार आहे. वर्कलोड मॅनेजमेंट लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, दक्षिण आफ्रिकेचे माजी कर्णधार एबी डिविलियर्स यांना हा निर्णय योग्य वाटलेला नाही. त्यांचे मत आहे की, बुमराहसारखा महत्त्वाचा गोलंदाज पाचही सामने खेळला पाहिजे.
बुमराहच्या विश्रांतीबाबत डिविलियर्स काय म्हणाले?
भारताने लीड्समध्ये झालेला पहिला कसोटी सामना इंग्लंडकडून ५ गड्यांनी गमावला. दुसरा सामना २ जुलैपासून बर्मिंघममधील एजबेस्टन स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी कोच गौतम गंभीर यांनी जाहीर केले होते की बुमराह केवळ तीन कसोटीत खेळणार आहे. याच मुद्द्यावर डिविलियर्स यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
गंभीर आणि टीम मॅनेजमेंटवर रोष
डिविलियर्स यांनी कोच गंभीर आणि टीम इंडियाच्या व्यवस्थापनावर थेट टीका केली आहे. त्यांनी माजी दिग्गज वेगवान गोलंदाज डेल स्टेन याचे उदाहरण देत सांगितले की, स्टेनला नेहमी महत्त्वाच्या कसोटी मालिकांमध्ये सहभागी करून घेतले जायचे, आणि कमी महत्त्वाच्या मालिकांमध्ये विश्रांती दिली जायची.
डिविलियर्स म्हणाले, “बुमराह सध्या सर्व फॉर्मेट्समध्ये जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. अशा वेळी त्याला विश्रांती देणे हे योग्य निर्णय नाही. माझ्या मते कसोटी क्रिकेट हा सर्वात प्रतिष्ठेचा फॉर्मेट आहे. त्यामुळे पाचही सामन्यांमध्ये बुमराहचा सहभाग अत्यंत गरजेचा होता.”
डेल स्टेनप्रमाणे व्यवस्थापन हवे
आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना डिविलियर्स यांनी सांगितले, “आम्ही स्टेनसोबत नेहमी असंच करत असू. वनडे आणि टी20 मालिकांमध्ये त्याला विश्रांती द्यायचो, पण ऑस्ट्रेलिया, इंग्लंड किंवा भारतासारख्या संघांविरुद्ध कसोटी मालिकांमध्ये त्याला पूर्ण सहभाग दिला जायचा. हे त्या काळातील आयसीसी रँकिंगवर अवलंबून असायचं.”
