द ओव्हल, लंडन – भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याचा आज चौथा दिवस आहे. भारताला सामन्यात विजय हवा असेल, तर इंग्लंडचे सर्व फलंदाज तंबूत पाठवावेच लागतील. मात्र याच वेळी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजकडून एक गंभीर चूक झाली, ज्यामुळे इंग्लंडला दुहेरी फायदा मिळाला आणि भारतीय संघाचं उत्साहाचं वातावरण एका क्षणात निराशेत बदललं.
हॅरी ब्रूकला मिळालं जीवनदान
हा प्रकार इंग्लंडच्या दुसऱ्या डावातील 35व्या षटकात घडला. प्रसिद्ध कृष्णा गोलंदाजी करत होते. त्यांनी टाकलेल्या बाउंसरवर हॅरी ब्रूकने पुल शॉट खेळला आणि चेंडू टॉप एज झाला. बॉल हवेत जाताच प्रसिद्ध कृष्णा जल्लोष करत होते. लॉन्ग लेगवर उभ्या असलेल्या सिराजने मागे जाऊन चेंडू झेलला, मात्र झेल घेतल्यानंतर ते अजून एक पाऊल मागे सरकले आणि त्यांचा पाय थेट बाउंड्री कुशनला लागला.
सीमेचा स्पर्श, ६ धावांचा फटका
संतुलन ढासळल्यामुळे सिराज पूर्णपणे सीमारेषेच्या आत गेले आणि त्यामुळे झेल अमान्य ठरला. या घटनेने पूर्ण भारतीय संघ खजील झाला, तर इंग्लंडच्या खात्यात विकेटऐवजी थेट ६ धावा जमा झाल्या. हॅरी ब्रूकने या संधीचा पुरेपूर फायदा घेत ३५व्या षटकात एकूण १६ धावा ठोकल्या, ज्यात दोन चौकारांचाही समावेश होता.
ब्रूक १९ धावांवर खेळत असताना मिळालं जीवनदान
जेव्हा ब्रूकला हे जीवनदान मिळालं, तेव्हा ते २१ चेंडूत १९ धावा करून खेळत होते. आता हा संधी ते किती परिणामकारकरित्या वापरतात, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. लंचपर्यंत इंग्लंडने ३ बाद १६४ अशी मजल मारली होती. विजयासाठी त्यांना अजून २१० धावांची गरज आहे, तर भारताला सामन्याचा निकाल आपल्या बाजूने वळवायचा असेल, तर उर्वरित ६ विकेट घेणं गरजेचं आहे.
सामना निर्णायक टप्प्यात
पाच सामन्यांच्या मालिकेत इंग्लंड २-१ ने आघाडीवर आहे. मँचेस्टरमध्ये झालेला चौथा सामना अनिर्णीत राहिला होता, त्यामुळे ओव्हलमधील हा सामना मालिका निर्णायक ठरू शकतो. इंग्लंडला विजय मिळवून मालिका खिशात घालायची आहे, तर भारताला हा सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडायची संधी अजूनही शिल्लक आहे.
